Is childhood being lost? : छोटेसे बहिण भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ, छोटेसे बहिण भाऊ…..
गीताच्या ओळी म्हणतच यापूर्वीच्या पिढीचं बालपण गेलेल आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शाळेचा आणि एक तास ट्युशनचा वेळ सोडला तर बाकीचा पूर्ण वेळ मनमुराद हिंडण्या- फिरण्याचा असा आजच्या पिढीच्या पालकांचा बालपणीचा काळ होय ना? प्रत्येकाच्या आजी-आजोबांकडनं, आई-बाबांकडून ही आजच्या मुलांनी हेच ऐकलं असेल नाही का? कारण त्यावेळी ना डिजिटल गॅजेट्स होते ना सोशल मीडिया होता शिवाय तासन् तास टीव्ही मोबाईल मध्ये रमणारे पालक ही नव्हते.
Is childhood being lost? | बालपण हरवत चालले आहे काय?
त्यावेळचे पालक होते. ते आपल्या मुलांवर भरभरून प्रेम करणारे. त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी हजर असणारे आणि मुलांचं बालपण टिकवणारे, तुम्ही म्हणाल ही सारी जी गुणवैशिष्ट्य आहेत ती आजच्या पालकांमध्ये नाहीत का? तर नक्कीच आहेत पण या गुण वैशिष्ट्यांसह त्यांच्याकडे डिजिटल गॅझेट्स आहेत त्यामध्ये बराचसा वेळ ते रमतात त्यामुळेच कदाचित आजची मुलं ही स्पर्धेचे युग, आधुनिक तंत्रज्ञानाचे युग या नावाखाली दिवसभर वेगवेगळ्या ट्युशन्स, क्लासेस आणि ऍक्टिव्हिटीजमध्ये गुंतलेली नव्हे नव्हे गुंतवलेली असतात असं ही म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
खरं सांगायचं तर आता पालकांच ही यात काहीच चुकत नाही कारण आज आपण बघतोय की जेव्हा मुलगा किंवा मुलगी दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा देते त्यानंतर तिचं जे करिअर आहे. त्या करिअर मध्ये जर त्यांना यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी अगदी पूर्व प्राथमिक वर्गापासून मुलांनी मेहनत करणं गरजेचं आहे हेच तर सतत आजची शिक्षण प्रणाली पालकांवर आणि पालक मुलांवर थोपवत चाललेली आहे.
आजची मुलं अगदी सकाळीच फाउंडेशन क्लासेसला जातात, तिथेच लंच ब्रेक मिळतो आणि पहिला टिफिन मुलं संपवतात. त्यानंतर सव्वा पाच वाजेपर्यंत पुढे शाळा असते. शाळा सुटली की सहा वाजेपर्यंत ती घरी पोहोचतात त्यानंतर एक ते दीड तास मुलांना वेळ भेटतो नंतर लगेचच मुल क्लासेससाठी घरा बाहेर पडतात मग काय यायला रात्रीचे साडेनऊ वाजतात त्यानंतर थोडा वेळ पालकांशी संवाद साधायचा, दिवसभराचा संपूर्ण लेखाजोगा त्यांच्यासमोर मांडायचा आणि मग झोपी जायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी महिलांचेट … बालपण हरवत चाललं आहे काय?
Is childhood being lost? | बालपण हरवत चालले आहे काय?
सकाळी उठलं की पुन्हा तीच दिनचर्या यात ही जर शाळेमध्ये, क्लासेस मध्ये होमवर्क दिलेला असेल तर मग मात्र रात्री झोपायला उशीर, मग सकाळी उठायला उशीर आणि मग आणखीन पुढे धावपळ असाच येणारा प्रत्येक दिवस सुरू होतो आणि संपत जातो. रविवार असला की काही तरी ऍक्टिव्हिटी नवीन असतेच शिवाय दोन आठवडयातून एकदा क्लासेसमध्ये रविवारी टेस्ट ही असतेच मग काय रविवारचा ही फार काही दिवस मस्तीत घालवायला भेटत नाही. काहीही असो रोजचं हे नियोजन ठरलेलं. घरी किंवा नातेवाईकांकडे एखादा सण समारंभ असला किंवा काही निमित्ताने कुठे जावयाचे असेल की आधीच आई पप्पांना टेन्शन मग ते तेच टेन्शन मुलांना देणार की अगं तुझा एवढा अभ्यासक्रम सुट्टीमुळे मागे पडला आहे.
पुढचे काही दिवस थोडाफार भेटणारा वेळ ही तो राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यात घालवायचा. एवढी सारी धावपळ केल्यानंतर आजारपण ही येतच की अधून-मधून मग पुन्हा शाळेला सुट्टी, क्लासेसला सुट्टी पुन्हा अभ्यासाचा ताण मुलांवरचा आणि त्यांच्या पालकांवरचा ही वाढणार मग काय पुढे आणखी ती व्यस्त होणार हेच कालचक्र अव्याहतपणे अगदी मुलांच्या बालपणापासून सुरू असलेलं मुलं अनुभवतात. यातून मुलांचं काही नुकसान होतंय असं नाही हं. मुलांना खूप काही शिकायला भेटते.
त्यांच्या ज्ञानात भर पडते, त्यांच्यातील महत्त्वकांक्षा वाढत जाते आणि त्यामुळेच कदाचित पुढे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या, एआय प्रणालीच्या युगात ती स्वतःला सिद्ध करू शकतात आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व समाजात निर्माण करू शकतील यात काही शंका नाही परंतु वर्तमान काळाचा विचार केला तर आजच्या मुलांचं बालपण मात्र या साऱ्या गोष्टींमध्ये कुठेतरी हरवत आहे असं मला ही जाणवतं आहे पण काय करणार शेवटी आयुष्यामध्ये पाहिलेली स्वप्न, निश्चित केलेली ध्येय पूर्ण करायची असतील तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीची उणीव ही जीवनात राहणारच होय ना ? आता आज जर त्यांनी स्वतःवर मेहनत घेतली नाही तर ते स्वतःची, त्यांच्या पालकांची स्वप्न पूर्ण करू शकणार नाहीत. आजच्या मुलांना ही या गोष्टीची जाणीव आहे की ती यशस्वीतेच्या साऱ्या स्पर्धेतून बाहेर पडतील आणि जीवनात हवं ते ध्येय, क्षितिज पार करू शकणार नाही आणि म्हणूनच पालकांनी आखून दिलेली जीवनशैली मुलं अगदी हसतमुखाने आणि आनंदाने स्वीकारतात.
आज शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली ही स्पर्धा, करिअरकडे असणारी मुलांची धाव कुठेतरी कमी करता येईल का यासाठी आपले शिक्षक वृंद आणि तज्ञ मार्गदर्शक यांना काही प्रयत्न करता येतील का ? किंवा काही थोडाफार
तरी विचार त्यांच्या मनात याविषयी यावा या आशेने हा विषय आज मी मांडला आहे. मला वाटतं मुलांच्या जीवनामध्ये त्यांची ध्येय आणि पुढचं शैक्षणिक, व्यावहारिक, भवितव्य जेवढं महत्त्वपूर्ण आहे तेवढंच महत्त्वपूर्ण आहे आजचं मुलांच बालपण त्यांनी जगणं आणि ते इतरांनी जपणं. तेव्हा आजच्या शिक्षण प्रणालीने शिक्षकांनी, पालकांनी परीक्षेतील संख्यात्मक विकासासाठी जी स्पर्धा आज निर्माण केलेली आहे ना ती कुठेतरी थोडी कमी करावी. दिवसभरात थोडा तरी वेळ मुलांच बालपण जपण्यासाठी त्यांना प्राप्त व्हावा. मुलांना ही अगदी आपल्या आजी-आजोबांसारखं, आई-वडिलांसारखं मन मोकळं, मनमुराद आणि आनंदी बालपण जगता यायला हवं असंच मुलांना वाटतं.
वाचकहो मुलांचं शैक्षणिक, व्यवहारिक, सामाजिक, सांस्कृतिक भवितव्य उत्तम घडवून एक परिपूर्ण, सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणून मुलांनी स्वतःला सिद्ध करावयाचं आहे अशा अपेक्षा असतील तर मग आपणच आपल्या मुलांमधील ही चुरस थोडीशी कमी करू या आणि अभ्यासासोबतच त्यांचा परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास कसा आपल्याला घडवून आणता येईल याकडे लक्ष देऊ या कारण पालकांना दिसत आहे ती फक्त स्पर्धा आणि मुलांना मात्र आपलं बालपण संपत जात असल्याची खंत मनात दिसत आहे. आता अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मुलांना ही त्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सातत्य ठेवावं असंच वाटत असतं पण कुठेतरी त्यांना त्यांचं बालपण ही जपायचं आहे.
Is childhood being lost? बालपण हरवत चालले आहे काय? आणखी एक महत्त्वपूर्ण बाब ती म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षण प्रणाली आणि पालकांच्या अपेक्षा यामुळेच मुलांचं बालपण हरवत आहे असं नाही तर आजची जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी सुद्धा यासाठी कारणीभूत आहे बर का कारण मुलं ही जेव्हा केव्हा मुलांकडे वेळ असतो तेव्हा मित्र-मैत्रिणींसोबत मैदानी खेळ खेळण्यापेक्षा किंवा आपल्या पालकांसोबत मनमोकळ्या गप्पा करणे, छंद जोपासणे यापेक्षा मोबाईल, लॅपटॉप किंवा मग टीव्ही पाहण्यात मग्न होतात यात मुलांची ही चुकी आहे बर का पण काय करणार काही गोष्टी कळतात पण वळत नाहीत असो आज मी मांडलेले हे विचार आपणा सर्वांना आवडले असतील, रुचले असतील अशी अपेक्षा करते आणि सर्व तज्ञ व्यक्तींना, शिक्षकांना, पालकांना मी अगदी कळकळीची विनंती करू इच्छिते की कुठेतरी मुलांचं बालपण जपण्याचा ही त्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबत आपण सर्वांनी प्रयत्न करावा. सौ. सुमेधा कुलकर्णी परभणी
