Positive Discipline: शासनाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला. या शासन निर्णयाद्वारे शाळेत मुलांना कोणतीही शारीरिक शिक्षा करण्यास प्रतिबंध केला आहे. केवळ शारीरिक शिक्षा नाही तर मुलांना अपमानास्पद बोलणे, नावे ठेवणे, गाल ओढणे अशा सर्वप्रकारच्या शिक्षेवर कायद्याने बंदी घातली आहे. मग अशावेळी काय करावं? मुलांना शिस्त कशी लावावी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले आहेत. त्यांचीच उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या एका दहावीच्या विद्यार्थिनीने स्वतःचे जीवन संपवले. का? तर तिला काही पेपर कठीण गेले आणि आता काही आपल्याला ९५% गुण मिळू शकत नाही. असे वाटून एका कोवळ्या जीवाने आपले जीवन संपवले.
Positive Discipline
More Content: नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे
सोळा वर्षांच्या मोहितने दहावीच्या प्रिलिमचा केवळ एक पेपर दिला. पुढील परीक्षेस तो आलाच नाही. पालकांशी फोनवर संपर्क केला असता; तो रोज घरातून ‘परीक्षेसाठी वेळेवर निघत होता पण शाळेत मात्र येत नव्हता. त्याच्याशी अत्यंत मोकळ्या वातावरणात चर्चा केल्यावर असे लक्षात आले की त्याचा आत्मविश्वास पूर्ण ढासळला होता.
घरी, शाळेत त्याची त्याच्या हुशार बहिणीशी होणारी तुलना आणि त्यातुन,’ तुला काही जमणार नाही.’ हे सतत कानावर आदळणारे वाक्य मोहितचे भावविश्व उध्वस्त करत होते.
आपलीच मुले पाहता पाहता निराशेच्या खाईत लोटली जातात. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात. पहिल्या उदाहरणात मुलीवर ९५% गुण मिळविण्याचा ताण असेल. म्हणूनच परीक्षाही न देता तिने या जगाचा निरोप घेतला. अत्यंत दुःखदायक आणि सर्व पालकांना, शिक्षकांना आत्मपरीक्षण करावयास लावणारी ही घटना आहे.
दुसऱ्या उदाहरणात मोहितचे असे खच्चीकरण झाले ते ही त्याच्या जवळच्या माणसांकडून; की त्याचा आत्मविश्वास ढासळला. जेव्हा आपल्याला कोणी टोचून बोलतो तेव्हा निराशेचे मळभ दाटते. कॉर्टिसॉल सारखी ताण निर्माण करणारी रसायने मेंदूत निर्माण होतात आणि मग तणावाची एक लहर शरीरात पसरते जी आपल्याला नकारात्मकते कडे घेऊन जाते.
अजाणतेपणी आपण आपल्याच मुलांचे आयुष्य तणावपूर्ण करीत असतो. घरातील वातावरण हे हलके फुलके, आनंदाने भरलेले असावे.
त्याहीपेक्षा लोकशाही तत्वांना धरुन असावे. आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य, समता न्याय, सहकार्य ही लोकशाही तत्वे आपण आपल्या घरात आचरणात आणलीत तर घराघरातील युद्धजन्य परस्थिती बदललेली दिसेल.
शिक्षक, पालक, विदयार्थी यांच्यामधे न्याय, स्वातंत्र्य, समता, सहकार्य यांवर आधारलेले नाते विकसित झाले पाहिजे. असे झाले तर मुले सुद्धा स्वयंस्फूर्तीने समाजास योग्य असे वर्तन करतील ज्यास आपण स्वयंशिस्त म्हणतो. ही तत्वे आचरणात आणण्यासाठी शिक्षक, पालक यांना स्वतःमधे विचारपूर्वक काही बदल करावे लागतील.
बरेचदा मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न घरोघरी होताना दिसतो. पालक बरेचदा शिस्त लावण्यासाठी स्वतःच नियम बनवतात आणि निक्षून मुलांना सांगतात, ‘तू असच वागले पाहिजे.’ सारे एकतर्फी. मुलांच मत विचारात घेतले जात नाही. मग मुले बंड करतात. घर कमी आणि युद्धाचा आखाडा जास्त. बरेचदा मुलांचा आदर राखला जात नाही. मुलांना आई वडील शत्रू वाटू लागतात. आदर, आत्मसन्मान यावर सर्वांचाच समान सकारात्मकशिस्त Positive Discipline
हक्क असतो. मुलांनाही स्व ची जाणिव असते. हे लक्षात घेऊन मुलांशी प्रेमाचा संवाद ठेवला पाहिजे. शिस्त हा अपल्या कुटुंब, शाळा येथील परवलीचा शब्द आहे. मला माझे लहानपण आठवते तेव्हा आठवतात वडिलांचे कडक नेत्रकटाक्ष. पाहुण्यांनी आणलेला खाऊ घेताना मी नजरेनेच त्यांची परवानगी घेत असे. वर्तमानात मात्र घरात सुद्धा न्याय, स्वातंत्र्य, समता, सहकार्य या तत्वांचा अवलंब त्यातून निर्माण होणारी स्वयंशिस्त आणि सहकार्य महत्वाचे.
मुलांना स्वातंत्र्य कसे असावे? स्वातंत्र्य म्हणजे कसेही वागण्याची मोकळीक का ? अशी पूर्ण मोकळीक दिली तर स्वेराचार आणि पलकांप्रती अनादर बळावेल का? मग स्वयंशिस्त तरी कशी निर्माण होईल ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. यावर संशोधनातून डॉ. जेन नेल्सन यांनी positive discipline म्हणजेच शिस्त पण ती ही सकारात्मक म्हणजेच विधायक. ‘ सकारात्मक शिस्त ही अत्यंत प्रभावी संकल्पना मांडली आहे.
डॉ. जेन नेल्सन यांच्या मते सकारात्मक शिस्त म्हणजे अति कडक शिस्त आणि अति स्वातंत्र्य यातून काढलेला मध्यम मार्ग. अति कडक शिस्त म्हणजे, ‘ तू असच वागलच पाहिजे.’ या बंधनात मुले बंडखोर होतात. तर अति स्वातंत्र्य असेल तर यातही मुलांच्या वर्तन समस्या निर्माण होतात.
मग करावं तर काय करावं? यावेळी डॉ जेन नेल्सन यांची सकारात्मक शिस्त – Positive Discipline उपयोगी येते. प्रेम, दयाळूपणा याच जोडीला ठामपणा या दोन्ही मार्गांचा अवलंब करून मुलांमधे विधायक शिस्त आपण निर्माण करू शकतो.
अशी शिस्त Positive Discipline निर्माण करणे ही सहज पण दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. यात पालक, शिक्षक, विद्यार्थि या सर्वांचीच भूमिका महत्वाची आहे. जेणेकरून आपले जीवन हे आनंदाचे नंदनवन होईल आणि त्यातून उद्याची सक्षम, विधायक नवीन पिढी घडेल.
संध्या सोंडे, पालघर

Pingback: Sri Guru Gobind Singh Ji Maharaj | श्री गुरू गोबिंद सिंघजी महाराज - Nanded News
Pingback: The disease called screen time | स्क्रीन टाइम नावाचा रोग - Nanded News